लोहारा तालुका निर्मितीनंतर अनेक शासकीय कार्यालय कार्यान्वित झाले. परंतु आजही लोहारा तहसील कार्यालयामध्ये अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावे अन्यथा लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Briged) वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
धाराशिव (Dharashiv) येथे जिल्हाधिकारी यांना सोमवारी (दि. ८) दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा हा ग्रामीण भागातील मागासलेला तालुका आहे. या तालुक्यामध्ये शेतकरी वर्गांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्या अनेक योजना, प्रकल्प मोहिम राबवले जातात. महसूल विभागांमध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे व अनेक पदे रिक्त असल्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची, शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अव्वल कारकुनाकडे मुळ पदासह नायब तहसीलदारांचाही अतिरिक्त पदभार देवुन कामकाज चालविण्यात येत आहे. महसुल सहाय्यकाकडे दोन-तीन अतिरिक्त विभागाचा पदभार असल्यामुळे सुट्टी दिवशी देखील कार्यालयात बसुन कर्मचार्यांना प्रलंबित कामे व शासनाला उपयोगी असणारी माहिती द्यावी लागते. नागरिकांना छोट्या मोठ्या कामासाठी अनेकदा तहसील कार्यालयाच्या दैनंदिन चकरा मारत उंबरठे झिजवावे लागत आहे.
तसेच तहसील कार्यालयातील सर्व कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने चालु असल्यामुळे इंटरनेटची कमतरता, लाईटची कमतरता भासत असल्यामुळे कामांमध्ये अनेक प्रकरणे पेडिंगमधे असून याचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणुन लोहारा हा दुष्काळग्रस्तात असल्यामुळे येणाऱ्या पाणीटंचाई, चारा टंचाई याकडे महसुल विभागाला प्रमुख भुमिका व जबाबदारी पार पाडावी लागणार असुन तसेच येणाऱ्या आगामी लोकसभेची पूर्वतयारी कामकाजाचे नियोजन असल्यामुळे तात्काळ रिक्त पदे भरण्यात यावे. तसेच लोहारा तहसील कार्यालयातील रिक्त असलेले नायब तहसीलदार, पुरवठा निरक्षक, महसूल सहाय्यक, तलाठी, शिपाई, अव्वल कारकून, लिपिक तसेच तलाठी डाटा ऑपरेटर सह आदी रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे अन्यथा लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा या निवेदनात दिला आहे.
लोहारा तहसील कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात न आल्यास ३० जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे या निवेदनात म्हटले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे धाराशिव जिल्हाप्रमुख शरद पवार, लोहारा तालुका प्रमुख बालाजी यादव उपस्थित होते.