लोहारा (lohara) तालुक्यातील तावशीगड येथे सोमवारी (दि.२०) खरीप (kharip) हंगाम नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्यातील तावशीगड येथील श्री खंडोबा मंदिर येथे खरीप हंगाम २०२४ च्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी महेश देवकाते व मंडळ कृषी अधिकारी शिवाजी तारळकर यांच्या मार्गदर्शनानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन, तुर, उडीद, मूग पिकाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये सोयाबीन पिकाची लागवड, खत व्यवस्थापन, पीक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, बिबीएफद्वारे पेरणी, गोगलगाय नियंत्रण, सोयाबीन (soyabin) उगम क्षमता चाचणी प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. तसेच महाडीबीटी योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळे, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, शेततळे अशा सर्व प्रकारच्या विविध योजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड याविषयी कृषी सहाय्यक नागेश जट्टे व कृषी पर्यवेक्षक एम. एम. फावडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.