गेल्या काही महिन्यात लोहारा ते कानेगाव मधला जुना रस्ता डांबरीकरण करण्यात आला होता. परंतु काही महिन्यातच हा रस्ता चक्क उखडून गेल्याने याठिकाणी तात्काळ नव्याने बनवण्यात यावे अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईल हलगी बजाओ आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना शुक्रवारी (दि.१३) दिलेल्या लेखी निवेदनात दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा ते कानेगाव जुना मधला रस्ता हा कानेगाव भातागळी आरणी तसेच शेजारील कास्ती खुर्द सह आदी गावासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा व उपयुक्त आहे. प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कानेगाव या ठिकाणी श्री संत मारुती महाराज यांच्या समाधी स्थळावर दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात जातात आणि विशेष म्हणजे कानेगाव ते लोहारा हा जुना मधला रस्ता अवघ्या ६ कि.मी. अंतराचा रस्ता आहे. हा डांबरीकरण रस्ता चक्क रात्रीच्या वेळी करण्यात आला आहे. शासकीय कामे रात्री करण्याचे मुख्य हेतू काय तसे सार्वजनिक शासकीय कामे रात्री करता येते का याचीही चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनात पुढे म्हणले आहे की, सदर रस्ता उखडून जागोजागी खड्डे व केवळ डस्टचा थर उघड्यावर पडला आहे. या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या डांबरीकरण रस्त्याबाबत संबंधित गुत्तेदार व संबंधित अभियंता यांच्या संगनमतामुळे हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने या निवेदनात केली आहे. रस्ता बनवताना डांबराचे प्रमाण कमी वापरण्यात आले आहे. साईड पट्ट्या भरले नाहीत, रस्त्याचे अंदाजपत्रक रकमेचा फलक लावण्यात आला नाही. यासाठी संबंधित वरिष्ठांनी रस्त्याची पाहणी करावी. डस्ट उघड्यावर उखडून पडल्याने दुचाकी वाहनाचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तात्काळ हा रस्ता नव्याने दबाई व डांबरीकरण करून मजबूततीकरण करण्यात यावे अन्यथा दिनांक २७ सप्टेंबर रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर हलगी बजावो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात येईल.
यापुढेही हे काम न झाल्यास लोहारा तहसील कार्यालयासमोर नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी आमरण उपोषण करण्यात येईल याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले असून या निवेदनावर संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव यांची स्वाक्षरी आहे.