लोहारा (Lohara) शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि.९) गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या यु. व्ही. पाटील या होत्या. यावेळी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, प्रभारी गटविकास अधिकारी जगदेव वग्गे, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी विश्वजित चंदनशिवे, वजीर अत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनील बहिरे यांनी केले. महाविद्यालयाची माहिती व विद्यार्थ्यांची प्रगती याविषयी त्यांनी थोडक्यात माहिती दिली. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार रणजितसिंह कोळेकर म्हणाले की, तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायच आहे ते निश्चित करा आणि त्यासाठी आत्तापासूनच परिश्रम घ्या. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिस्थितीची जाण अधिक असते. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज करा असे आवाहन तहसीलदार कोळेकर यांनी केले. यावेळी बोलताना प्राचार्या यु. व्ही. पाटील म्हणाल्या की, जिद्द, निष्ठा आणि कष्ट या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. त्यामुळे आपण या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या गुणवंत विद्यार्थ्यांकडून तुम्हीही प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. तसेच विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. आपल्यामध्ये असलेली क्षमता, कौशल्य ओळखा. आई वडील व आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी जगदेव वग्गे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेचा १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल ९५.८३ टक्के लागला आहे. प्रथम आलेला अथर्व अरुण सूर्यवंशी, द्वितीय प्रेमनाथ शंकर सूर्यवंशी व तृतीय आलेली अश्रीशा श्रीकांत मोरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून प्रथम आलेली देवकन्या बालाजी जाधव, द्वितीय वैभवी वामन वाघमारे, तृतीय ईश्वरी प्रफुल्ल पाटील, वाणिज्य शाखेतून प्रथम आलेली संध्या पांडुरंग हुलगुंडे, द्वितीय अंकिता आत्माराम कदम व तृतीय तृप्ती रमेश शिवकर तसेच कला शाखेतून प्रथम तैसीन हबीब हेड्डे, द्वितीय माहेश्वरी माने व तृतीय यश कांबळे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या देवकन्या बालाजी जाधव या विद्यार्थिनीला प्राचार्या यु. व्ही. पाटील यांच्या वतीने रोख रक्कम व पारितोषिक देण्यात आले. तसेच प्रा. प्रशांत काळे यांच्या वतीने तीनही शाखेतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आले. तसेच प्रा. विद्यासागर गिरी यांच्या वतीने मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी तर श्रीकांत मोरे यांनी आभार मानले. यावेळी भास्कर जाधव, धनराज धनवडे, प्रा. विद्यासागर गिरी, प्रा. विठ्ठल कुन्हाळे, प्रा.आर.डी. साळुंके, प्रा. उध्दव सोमवंशी, प्रा. नारायण आनंदगावकर, प्रा. डी. आर. साठे यांच्यासह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

