लोहारा (Lohara) तालुक्यातील माकणी येथे सोमवारी (दि.९) संत शिरोमणी मारुती महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महाराजांच्या पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
तालुक्यातील माकणी येथे संत शिरोमणी मारुती महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. माकणी येथे सोमवारी (दि.९) सकाळी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पादुका मंदिरापर्यंत टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत पालखीतून महाराजांच्या पादुका तर बैलगाडीत महेश महाराज व श्यामचैतन्य महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डोक्यावर कळश घेतलेल्या महिला, धनगरी ढोल, हलगी, वारुच्या पथकासह परिसरातील गावातून आलेले भजनी मंडळ या मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच उमरगा तालुक्यातील भुसणी येथील श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्री संत ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था, निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील श्री संत देवाजी बाबा वारकरी शिक्षण संस्था येथील वारकरी शिक्षण संस्थेचे व माकणी येथिल जिल्हा परिषद शाळेचे जवळपास तीनशे विद्यार्थी यावेळी टाळ मृदंगासह सहभागी झाले होते.
सकाळी नऊ वाजता निघालेली ही मिरवणूक दुपारी एकच्या सुमारास पादुका मंदीराजवळ पोहोचली. यावेळी संताच्या आरतीने सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या मिरवणूकीत माकणीसह करजगाव, धानुरी, हराळी, तोंरबा, करवंजी, चिंचोली (काटे), खेड सालेगाव, तावशीगड, सास्तूर, लोहटा, सारणी, मातोळा या गावासह परिसरातील भजनीमंडळ, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.