धाराशिव भारत स्काऊट्स आणि गाईड्स (Scouts and Guides) जिल्हा कार्यालय धाराशिव, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, धाराशिव (Dharashiv) व हायस्कूल लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत लोहारा शहरातील हायस्कूल लोहारा येथे जिल्हा मेळाव्याचे (District Meet) आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी जिल्हयातून ६ ते १६ वर्ष वयोगटातील सुमारे १५०० विद्यार्थी/विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी तंबु मध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या तीन दिवसीय निवासी जिल्हा मेळाव्यात संचलन, समुहगीत, लोकनृत्य, तंबू निरिक्षण, बिन भांडयाचा स्वयंपाक, प्रश्नमंजूषा, शेकोटी कार्यक्रम व स्काऊट गाईड अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. व्यक्तिमत्व घडविण्यात पालक, शिक्षक, स्काऊट गाईड जिल्हा संस्था व भोवतालचा समाज यांचा प्रमुख वाटा असतो. सध्याच्या धावपळीत आई वडिलांना मुलांकडे लक्ष दयायला सवड नसते, त्यामूळे स्काऊट गाईड जिल्हा संस्थेची मुलांवर चांगले संस्कार करण्याची फार मोठी जबाबदारी आहे. मुलांना मध्यवर्ती धरून त्याला योग्य असा कार्यक्रम स्काऊट / गाईड कार्यालय शिक्षणाद्वारे दिला जातो. आजच्या पिढीतील मुले ही निसर्ग निवास शिबीरापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे जिल्हा कार्यालयातर्फे हा मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो.
सर्वधर्म समभाव जोपासणारी गणवेशधारी तरूण/तरूणींची जागतिक स्तरावरची चळवळ असे या चळवळीचे स्वरूप आहे. ३ वर्षाच्या बालकापासून ते २५ वर्षाच्या युवक युवतींच्या मनावर या चळवळीद्वारे संस्कारक्षम वयात उदात्त मुल्ये जोपासली जातात व मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास केला जातो. शील, सेवा, आरोग्य व हस्त व्यवसाय इ. कला गुणांनी संपन्न असा हा मेळावा लोहारा शहरातील हायस्कूल लोहारा येथे घेण्यात येत आहे. या मेळाव्यात जिल्हयातील सर्व कब-बुलबुल/स्काऊट गाईड विद्यार्थी, स्काऊटर / गाईडर शिक्षकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी सुधा साळुंके, जिल्हा स्काऊट अधिकारी विकांत देशपांडे, मेळावा संयोजक तथा हायस्कूल लोहारा या प्रशालेचे मुख्याध्यापक दयानंद पोतदार, जिल्हा चिटणीस तथा उप शिक्षणाधिकारी (प्राथ.) अरविंद मोहरे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त तथा मेळावा प्रमुख दिपक पोतदार, सहा. मेळावा प्रमुख सुरेश वाघमोडे, वैजिनाथ पाटील, उषा सर्जे, सविता पांढरे, यांनी केले आहे.