लोहारा तालुक्यातील भोसगा ग्रामपंचायतच्या सरपंच निवडीसाठी शुक्रवारी (दि.२८) ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. यात सरपंच पदाची निवड करण्यात येणार आहे.
तालुक्यातील भोसगा ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक दि. १५ जानेवारी २०२१ रोजी झाली होती. भोसगा ग्रामपंचायतमध्ये एकूण ९ ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यानंतर दि. ८ फेब्रुवारी २०२१ रोजी भोसगा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. शशिकला गोसावी यांची निवड झाली होती. त्यांनी दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे लोहारा तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्या आदेशानुसार सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार शुक्रवारी दि.२८ जून रोजी दुपारी दोन वाजता अध्यासी अधिकारी जे. टी. वग्गे यांच्या अध्यक्षतेखाली भोसगा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. यात सरपंच पदाची निवड करण्यात येणार आहे. दि. २८ रोजी सकाळी १० ते १२ वाजता या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. त्यानंतर एक ते दोन या कालावधीत नामनिर्देशन पत्र माघारी घेता येणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा होणार आहे. यात सरपंच पदाची निवड केली जाणार आहे.