लोहारा येथील अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम कुस्तीत रामलिंग मुदगड येथील प्रदीप गोरे याने विजय मिळवून लोहारा केसरी किताब पटकावला. अंतिम कुस्ती निकाली निघताच कुस्तीप्रेमींनी एकच जल्लोष केला. यात वडगाव वाडी येथील जीवन भुजबळ उपविजेता ठरला. लोहारा महाशिवरात्री यात्रामहोत्सवा निमित्त शहरातील लोहारा हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारी (दि. ९) कुस्ती स्पर्धा पार पडल्या. यावेळी कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
महाशिवरात्री यात्रामहोत्सवानिमित्त मागील दोन दिवसापासून शहरात विविध कार्यक्रम होत आहेत. यात्रामहोत्सव समितीच्या वतीने शनिवारी (दि. ९) भव्य कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन झाले. यावेळी माजी सरपंच शंकर जट्टे, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, नगरसेवक विजयकुमार ढगे, दिपक मुळे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, गोपाळ सुतार, विठ्ठल वचने यांच्या प्रमुख उपस्थितीत कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले. या कुस्तीच्या आखाड्यात तालुक्यासह इतर जिल्ह्यातील नामवंत मल्ल सहभागी झाले होते. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या कुस्त्या रात्री सव्वा दहा वाजता संपल्या. १०० रुपयांपासून ४ हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या झाल्या. या दरम्यान लोहारा येथील सद्गुरू कुस्ती संकुलाच्या मल्लांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शेवटची कुस्ती माजी सरपंच शंकर जट्टे, बलभीम रसाळ, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली.
अंतिम कुस्तीसाठी सहा जणांची नोंदणी झाली होती. त्यामुळे लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून लॉट्स पध्दतीने कुस्त्या लावण्यात आल्या. वडगाववाडी येथील जीवन भुजबळ व रामलिंग मुदगड येथील प्रदीप गोरे यांच्यात अंतिम कुस्ती झाली. ही कुस्ती जवळपास अर्धा तास चालली. अखेर ही कुस्ती प्रदिप गोरे याने जिंकली. कुस्तीचा निकाल लागताच उपस्थितीतांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदिप गोरे याला जट्टे कुटुंबियांच्या वतीने ३५ तोळे महादेवाची चांदीची पिंड देऊन गौरविण्यात आले. उपविजेता जीवन भुजबळ याचाही सत्कार करून त्याला ५ हजार रुपये बक्षीस देण्यात
आले. यावेळी शंकर जट्टे, चंद्रकांत पाटील, विठ्ठल वचने, श्रीनिवास माळी, अमोल बिराजदार, श्रीहरी रसाळ, गोपाळ सुतार, सतिश ढगे, ओम पाटील, विरेश स्वामी, भीमाशंकर डोकडे, बलभीम रसाळ, ओम पाटील, प्रभाकर बिराजदार, ईश्वर बिराजदार, आप्पु स्वामी, हरी लोखंडे, रामेश्वर कार्ले, वैजिनाथ माणिकशेटटी, अंकुश परिट, दयानंद साळुंके, किरण पाटील, जितेश फुलकरते, पप्पु मुळे, हणमंत गरड, बसवराज पाटील, ज्ञानेश्वर काडगावे आदींसह कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी पंच म्हणून रामेश्वर कार्ले, दयानंद साळुंके, हरी वाघे, वैजिनाथ पाटील, बसवराज पाटील, हणमंत गरड यांनी काम पाहीले.