लोहारा (lohara) तहसिल कार्यालयात (tahsil office) शुक्रवारी (दि.३१) मान्सूनपूर्व आढावा बैठक ( Pre-monsoon review meeting) घेण्यात आली. यावेळी तहसीलदार (tahsildar) काशिनाथ पाटील यांनी उपस्थित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
पुढील काही दिवसांत पावसाळा सुरू होणार आहे. अशात तालुक्यात मान्सूनपूर्व तयारी करण्यासाठी विविध विभागांचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी तहसीलदार काशिनाथ पाटील, नायब तहसीलदार सुजाता हंकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी सर्व विभागांच्या उपस्थित अधिकारी, प्रतिनिधींकडून माहिती घेतली तसेच त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार पाटील यांनी एमएसईबी विभागाला विद्युत पोल, विद्युत तारा दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत त्या ठिकाणी दुरुस्ती करून घ्या, अरुंद पूल असेल त्या ठिकाणी सूचना फलक लावण्याच्या सूचना दिल्या. लोहारा शहरातील सर्व प्रभागात स्वच्छता करून घ्या, लाईटची व्यवस्था करा अशा सूचना लोहारा नगरपंचायत ला दिल्या. नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा अशी सूचना आरोग्य विभागाला दिल्या. माकणी येथील धरणातील वाकलेले पोल, तारा दुरुस्ती करून घ्या अशी सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणे उपलब्ध करून द्या, बोगस बी बियाणे किंवा शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी सूचना कृषी विभागाला दिली. यावेळी तहसीलदार पाटील यांनी ईतर विभागालाही आवश्यक त्या सूचना दिल्या.
या बैठकीसाठी नायब तहसीलदार (पुरवठा) डी. जी. शिंदे, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र पापडे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता संतोष घोडके, दुय्यम निबंधक कार्यालयाचे ए. एम. वाटे, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी शैलेश जट्टे, नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक ए. बी. गोरे, महसूल सहाय्यक विनोद स्वामी, भागवत गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व उपस्थित होते.