कानपूर येथे पोलिसांनी मुस्लिम युवकांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ लोहारा शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने मंगळवारी (दि.२३) निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागणीचे निवेदन देण्यात आले.
लोहारा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यात मुस्लिम समाजातील युवक, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा तहसिल कार्यालयात आल्यानंतर नायब तहसीलदार रतन काजळे यांना निवेदन देण्यात आले. लोहारा तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, दि. ९ सप्टेंबर रोजी

कानपुर येथे पारंपारिक रीती नुसार ईद ए मिलाद निमित्त जुलूस काढण्यात आला होता. त्या जुलूस मध्ये काही लोकांनी आय लव्ह मोहम्मद या नावाचे फलक घेतले होते. त्यामुळे त्या १५ युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या युवकांवर गुन्हे दाखल झाल्याबद्दल आम्ही याचा तीव्र निषेध करत आहोत. तसेच हे दाखल केलेले गुन्हे बेकायदेशीर आहेत. हे गुन्हे रद्द करण्यात यावे तसेच ज्यांनी हे गुन्हे दाखल करण्यास लावले आहे. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. लहान मुलांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले.









