लोहारा (lohara) तालुक्यातील हराळी येथे १५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीचे लोकार्पण करण्यात आले.
तालुक्यातील हराळी (harali) गावात ग्रामस्थांच्या पुढाकाराने आणि ज्ञान प्रबोधिनीच्या मदतीने १५००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. वर्षानुवर्षे हजारो लिटर पाणी साठवणुकीची सोय नसल्याने पाणी वाया जात असे. यंदा दुष्काळ असल्यामुळे पाणी जपून वापरणे आवश्यक होते. म्हणून प्रबोधिनीचे गेले काही महिने आपला पाण्याचा टँकर ग्रामपंचायतीसमोर उभा करून ठेवला होता. पण हे काही कायम स्वरुपी उत्तर नव्हते. त्यासाठी तिथे पुरेशा क्षमतेची टाकी बांधण्याचे ठरले. प्रबोधिनीच्या नियमाप्रमाणे लोकवर्गणी आणि श्रमदानाचा आग्रह धरण्यात आला. त्याला ग्रामस्थांचा, विशेषतः महिला आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच बाहेर गावी कार्यरत असलेल्या अनेक जणांनी रोख रक्कम देवून आपला सहभाग नोंदवला. या सर्वांच्या मदतीने टाकीचे काम वेळेवर पूर्ण झाले.
या टाकीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (दि.९ ) संपन्न झाला. ज्ञान प्रबोधिनीचे जेष्ठ कार्यकर्ते आणि हराळी केंद्राचे संस्थापक कै. आण्णा ताम्हणकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या टाकीचे ‘ वसंत जलकुंभ ‘ असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी हराळी गावातील महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कै. आण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. ग्रामस्थांपैकी धोडींराम कांबळे व गणपती सुर्यवंशी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले अनुभव सांगितले. ज्ञान प्रबोधिनी हराळीचे केंद्रप्रमुख अभिजित कापरे यांनी आण्णांच्या आठवणींना उजाळा दिला आणि भविष्यात असेच मिळून गावाचा विकास करण्याचे आवाहन केले.