लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत शुक्रवारी (दि.१२) राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रमाता जिजाऊ यांची वेशभूषा केलेल्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थिनी आदिती गायकवाड व अर्चना शिंदे यांच्या व प्रशालेचे मुख्याध्यापक बी. टी.नादरगे यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे हे होते. यावेळी प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत ममता अशोक गोटमुखले प्रथम, मयूरी धर्मे द्वितीय तर प्रशांत घोसले याने तृतीय क्रमांक मिळवला. तर कन्हैया जीवन दासरे याने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते थोर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले लिखित ग्रंथ व रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मागील शैक्षणिक वर्षी जानेवारी २०२३ मध्ये आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना प्राप्त रोख पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रशालेतील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी. नादरगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात दोन्ही महापुरुषांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी तसेच जयंतीच्या निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण वाघमोडे यांनी तर विठ्ठल शेळगे यांनी आभार मानले.