लोहारा तालुक्यातील सालेगाव, तावशीगड व तोरंबा या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यातील सालेगाव, तावशीगड, तोरंबा व इतर गावातील ग्रामस्थांना पाहण्यासाठी ३,४ किलोमीटर अंतरावरून पायपीट करावी लागत आहे. लोहारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. लोहारा तालुक्यातील विविध गावातील ग्रामपंचायतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना टँकरची मागणी केली असताना सुद्धा गटविकास कार्यालयातून त्या त्या गावांना बोर अधिग्रहण करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. परंतु मागच्या दोन वर्षापासूनचे अधिग्रहणचे पैसे अजून पर्यंत उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे गावात एखाद्याकडे पाणी उपलब्ध असले तरी सुद्धा सदर व्यक्ती अधिग्रहण करण्यास मनाई करत आहे.
प्रचंड दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी नाहक त्रास होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये असंतोष
निर्माण झालेला आहे. लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.१४) जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, आयबीएस संस्थेचे सचिव गोपाळ माने, मुरलीधर पाटील, बालाजी मतोळे उपस्थित होते.