लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाने कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टापेक्षा जास्त शस्त्रक्रिया करून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आहे. त्याबद्दल जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त धाराशिव येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचा सन्मान करण्यात आला.
कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टापेक्षा जास्त शस्त्रक्रिया करून सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याबद्दल जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त धाराशिव येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष, जिल्हा आरोग्य अधिकारी एच. एल. हरिदास यांच्या हस्ते स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. भक्तराज ठोंबरे व कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धर्माधिकारी, डॉ. गायकवाड, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. के. के. मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनय कुलकर्णी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा बांगर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी, सहाय्यक संचालक डॉ. मारुती कोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मेढेकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी आदी उपस्थित होते. या पुरस्काराबरोबर स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. मैत्री तावशीकर कुटुंब कल्याण टाका शस्त्रक्रिया जिल्ह्यात प्रथम, डॉ. भक्तराज ठोंबरे कुटुंब कल्याण टाका शस्त्रक्रिया जिल्ह्यात द्वितीय तर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया साठी प्रवृत्त केल्या बद्दल स्टाफ नर्स मनीषा माने यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
जिल्ह्यात कुटुंब कल्याण उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्वाधिक योगदान देण्याऱ्या ३४ संस्था व अधिकारी, कर्मचारी यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्व मान्यवर व स्पर्श ग्रामीण सास्तूरचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी याप्रसंगी स्पर्शच्या सर्व डॉक्टर्स व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. रमाकांत जोशी यांनी आरोग्य विभागाचे आभार मानले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. एल. हरिदास यांच्या सतत मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे स्पर्श रुग्णालय जिल्ह्यात अव्वल ठरल्याचे स्पर्शचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी सांगितले.