ईव्हीएम मशिनचा वापर बंद करुन मतपत्रिकेवर मतदान घेऊन पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी लोहारा शहरातील नागरिकांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे केली आहे. लोहारा तहसीलदार यांच्यामार्फत सोमवारी (दि.१२) हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रगत देशामध्ये ईव्हीएम EVM) मशिनचा मतदानासाठी वापर केला जात नाही. परंतु भारतात या मशिनचा वापर केला जातो. सन २०१४ च्या लोकसभेच्या (Lok sabha) निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशिनचा गैरवापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष झालेले मतदान व मतमोजणी वेळी मोजण्यात आलेले मतदान यामध्ये प्रचंड तफावत दिसुन आली आहे. त्यामुळे देशातील नागरिकामध्ये ईव्हीएम मशिनरीवर विश्वास राहीलेला नाही. ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करुन योग्य व पारदर्शक निवडणुका होत नाहीत, अशी धारनना देशभरातील नागरिकांची झाली आहे. ईव्हीएम मशिनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मशिन हॅक होऊन मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केले त्याच उमेदवाराला मतदान मिळेल की नाही, याबाबत मतदारामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे देशात लोकशाही धोक्यात आल्याची लोकभावना निर्माण होत आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकीत निवडणुक अयोगाने ईव्हीएम मशिनचा वापर बंद करुन मतपत्रिकेवर मतदान घेऊन निवडणुक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
तहसीलदार काशिनाथ पाटील यांना ग्रामस्थांच्या सह्यांचे हे निवेदन देण्यात आले. यावेळी नरदेव कदम, अमोल बिराजदार, आयनोद्दीन सवार, शाम नारायणकर, सलीम शेख, के. डी. पाटील, नवाज सय्यद, महेबुब गवंडी, आकाश जावळे, बसवराज पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.