शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत पुणे येथे राज्यस्तरीय कलाउत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच या स्पर्धेचा निकाल घोषित झाला असून तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेच्या संघाने धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना लोकनृत्य या प्रकारात बहारदार आदिवासी नृत्य सादर करुन राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत राज्यभरातून ३६ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत आर.पी.डी. ज्युनि. कॉलेज सावंतवाडी सिंधुदुर्गचा संघ अव्वल ठरला असून, बाल विद्यामंदिर हायस्कूल,परभणीचा संघ दुसऱ्या स्थानी राहिला आहे. तर सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेच्या संघाने धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत तृतीय क्रमांक पटकावला. या संघात संध्याराणी कदम, रितेश देशमुख, भाग्यश्री कांबळे, भाग्येश इस्लामपूरे, महेश पवार सहभागी झाले होते. संघातील विद्यार्थ्यांना प्रविण वाघमोडे, निशांत सावंत, प्रयागताई पवळे, संजय शिंदे, शंकरबावा गिरी यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या यशस्वी संघाचे संस्थेच्या सचिव निर्मलाताई बदामे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमीतकर, वै.सा.का. सच्चिदानंद बांगर, कार्यालयीन अधीक्षक मोहन चव्हाण, सुधीर जाधवर, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे यांनी अभिनंदन केले आहे.