धाराशिव भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालय धाराशिव, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, धाराशिव व हायस्कूल लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन लोहारा शहरातील हायस्कूल लोहारा येथे गुरुवारी (दि.८) सायंकाळी पाचच्या करण्यात आले.
या मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे हे होते. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंके, पोलीस निरीक्षक अजित चिंतले, गटशिक्षणाधिकारी अहमद असरार, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम, भास्कर बेशकराव, सुभाष चव्हाण, माजी विस्तार अधिकारी मनोहर वाघमोडे, मेळावा संयोजक तथा हायस्कूल लोहारा प्रशालेचे मुख्याध्यापक दयानंद पोतदार, मेळावा प्रमुख दिपक पोतदार, सहाय्यक मेळावा प्रमुख सुरेश वाघमोडे, वैजिनाथ पाटील, उषा सर्जे, सविता पांढरे, माजी मुख्याध्यापक टी. के. मक्तेदार, नगरसेवक अमीन सुंबेकर, प्रशांत काळे, जालिंदर कोकणे, विजयकुमार ढगे, किशोर पाटील, नगरसेविका आरती गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षीय समारोपात बोलताना दयानंद जटनुरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना यापुढे तीन दिवसांमध्ये आरोग्यदायी गोष्टी अनुभवातून या ठिकाणी सांगितल्या जाणार आहेत. आणि याचा जो काही संस्कारक्षम वयामध्ये विद्यार्थ्यांच्या खोलवरती प्रभावाने परिणाम राहणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. यामध्ये शाळेने स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचंय आहे. त्याला काही गुण मिळणार आहेत. आणि गुणांमधून मधून जी शाळा महाराष्ट्र मध्ये प्रथम येईल त्या शाळेला ५१ लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटक आयुक्त विक्रांत देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश वाघमोडे यांनी तर लोहारा हायस्कूलचे मुख्याध्यापक दयानंद पोतदार यांनी आभार मानले. या तीन दिवसीय निवासी जिल्हा मेळाव्यात संचलन, समुहगीत, लोकनृत्य, तंबू निरिक्षण, बिन भांडयाचा स्वयंपाक, प्रश्नमंजूषा, शेकोटी कार्यक्रम व स्काऊट गाईड अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. शनिवारी (दि.१०) सकाळी आठ वाजता शोभायात्रा होणार असून दुपारी एकच्या सुमारास बक्षीस वितरण व निरोप समारंभ कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यासाठी जिल्हाभरातून एकूण ३२ शाळांतील ४३३ स्काऊट्स तर ३१५ गाईड्स सहभागी झाले आहेत.