मराठा (maratha) आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी लोहारा (Lohara) तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. १) लोहारा तहसीलदार काशिनाथ पाटील यांना हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, २४ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोहारा तालुक्यातील मराठा युवकांनी तहसील प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन शांततापूर्वक रास्ता रोको
आंदोलन केले होते. त्यावेळी मराठा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मराठा समाज गेल्या अनेक वर्षापासून शांततापूर्वक आंदोलने करत आहे. मात्र शांततापूर्वक आंदोलन करणाऱ्या मराठा युवकांवर प्रशासन जाणीवपूर्वक मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला व तहसीलदार लोहारा यांना निवेदन देऊन देखील मराठा युवकांवर दाखल झालेले गुन्हे अन्यायकारक असून ते तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी लोहारा तालुक्यातील मराठा समाज बांधव उपस्थित होते.