लोहारा तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात आले होते. यात तालुक्यातील ६८ जिल्हा परिषद शाळांनी सहभाग नोंदविला. यामध्ये तालुकास्तरीय मुल्यांकन समितीतर्फे मुल्यांकन करण्यात आले. यात तालुक्यातील कास्ती (बु) जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने तालुकास्तरावर प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
या शाळेस बक्षीस ३ लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरवण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हास्तरीय पथकाने भेट देवून शाळेचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मुल्यांकन केले आहे. यावर्षी कास्ती शाळेने कात टाकत शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत आरोग्य, पर्यावरण, तालुका, जिल्हा क्रिडा स्पर्धा, विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, परसबाग, उत्कृष्ट रंगरंगोटी, आनंददायी शनिवार आयोजन करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी, शाळेच्या भौतिक सुविधेसाठी तसेच शाळेस बहुमान मिळवण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कार्यालय, पालक, ग्रामस्थांच्या मदतीने शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे. या शाळेला सरपंच अखिल तांबोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाळ समदळे, उपाध्यक्ष महेश भरगंडे, सुदर्शन गुरव, शाहुराज पाटील, कस्तुरताई चव्हाण यांनी सर्वतोपरी सहकार्य केले आहे. या शाळेला परीसरातील शिक्षक, नागरीक शाळा भेट देत आहेत.
सकारात्मक विचारातून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कार्यालय, शिक्षक, ग्रामस्थ यांच्या एकजुटीमुळे आम्हाला यश संपादन झाल्याचे शाळेचे मुख्याध्यापक गिरीश जगताप यांनी सांगितले. शाळेचा स्वच्छ सुंदर परीसर, बोलक्या भिंती, गांडुळ खत निर्मिती, सिताफळाची ३०० झाडांची ठिबक सिंचनासह फळबाग, सुसज्ज क्रिंडागण, ६०० पुस्तकाचे ग्रंथालय, गुलाबाची बाग, शाळेची आकर्षक कमान, विविध सुविधा यासाठी गावातील सर्व घटकाचा मदतीचा हात मिळत आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात तालुकास्तरावर खो-खो, कबड्डी, फुटबॉल तर जिल्हा पातळीवर कबड्डी खेळात शाळेने दबदबा निर्माण केला आहे. तसेच नवोदय, शिष्यवृत्ती, इस्त्रो सहल परीक्षेमध्येही शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेमध्ये माझा ज्ञात इंग्रजी शब्दकोश, मराठी-इंग्रजी वर्तमानपत्र वाचन, अक्षरमैत्री, माझ्या आवडत्या कवितांचा संगृह, विज्ञानप्रयोग आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. शाळेसाठी अनेकांनी दातृत्वाचा मदतीचा हात पुढे केला आहे. शाळेसाठी देणगी स्वरुपात एक लाख पन्नास हजार रुपयांचा लोकवाटा व अनेक वस्तू मिळाल्या आहेत.
शाळेच्या यशाबद्दल मुख्याध्यापक गिरीश जगताप, शिक्षक व्यंकट पोतदार, एकनाथ कदम, बालाजी सोमवंशी, प्रविण अगंबरे, शिवाजी पोतदार, केशर वाघमारे, नितीन कदम, नितीन वाघमारे व मंदोदरी कोळी यांचे सरपंच अखिल तांबोळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ समदळे, उपाध्यक्ष महेश भरगंडे, बळीराम साबळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ व गटशिक्षण कार्यालयाने अभिनंदन केले आहे.
आमच्या शाळेचे सर्व शिक्षक होतकरू असून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, पालक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शाळा तालुक्यात अव्वल ठरली आहे. यापुढे जिल्हास्तरासाठी व शाळा आयएसओ करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सर्वांच्या एकजुटीने आमची शाळा प्रथम आली याचा आम्हांला अभिमान आहे.
- गोपाळ समदळे, अध्यक्ष – शाळा व्यवस्थापन समिती कास्ती बु.
यावर्षी शाळेचा कायापालट झाला असून आमची शाळा तालुक्यात प्रथम आली याचा आनंद आहे. ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने शाळेसाठी सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. यापुढेही भरीव सहकार्य करून शाळा जिल्ह्यामध्ये अव्वल आणण्यासाठी सर्वांच्या मदतीने प्रयत्न करू.
- परवेज तांबोळी
सामाजिक कार्यकर्ते, कास्ती बु.