लोहारा / प्रतिनिधी
लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नसल्यामुळे नागरिकांचे अनेक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे तात्काळ कायमस्वरूपी तहसीलदारांची नियुक्ती करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा ईशारा तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार यांनी बुधवारी ( दि. २३) दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नसल्यामुळे नागरिकांचे अनेक कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांची अनेक प्रकरणे निकालाअभावी धूळ खात पडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे. तसेच संजय गांधी योजनेतील लाभार्थी प्रस्ताव करूनही अद्याप बैठक घेण्यात आली नाही. तसेच गेल्या काही वर्षांपासून श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजनेतील प्रस्तावित फाइल गहाळ होत असल्याने तात्काळ लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी तहसीलदाराची नियुक्ती करावी अन्यथा लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. २७ जानेवारीला लोहारा तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, तालुका उपाध्यक्ष किरण सोनकांबळे, तालुका सचिव बालाजी यादव, प्रविण बोंदाडे आदींच्या सह्या आहेत.