वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील काही दिवसांपासून यावर्षीचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. परंतु ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अतिवेगामुळे अनेक ठिकाणी अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. अशा अतिवेगात ट्रॅक्टर चालविणाऱ्या चालकांना कारखाना व पोलीस प्रशासनाकडून ताकीद देणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.
कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला की, कोठे न कोठे अपघात झाल्याची घटना घडत आहे. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. परंतु अद्याप यात काही सुधारणा होताना दिसून येत नाही. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. तेथेही बहुतांश ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. परंतु अपघात होऊ नये यासाठी ट्रॅक्टर ट्राॅलीच्या पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर बसविले जातात. जेणेकरून विशेषतः रात्रीच्या वेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनांना लांबूनच पुढील वाहनाचा अंदाज येतो. तसेच त्या ठिकाणचे ट्रॅक्टरचालक अतिवेगात वाहने चालवीत नाहीत. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील कारखान्यांनीही ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविणे आवश्यक आहे. सध्या गळीत हंगाम सुरू आहे. लोहाऱ्याजवळील लोकमंगल, उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार, मुरूम येथील विठ्ठलसाई कारखान्यासह अनेक कारखान्याला तालुक्यातील ऊस गाळपासाठी जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर द्वारे ऊसाची वाहतूक केली जाते. ऊस वाहतूक करताना बिघाड झाल्याने सदरील वाहने सर्रास रस्त्यावरच उभी केली जातात. तसेच कारखान्यास ऊस देऊन परत येताना ट्रॅक्टर चालक अतिवेगात ट्रॅक्टर चालवत असतात. तसेच गाण्यांचा मोठा आवाज यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज ट्रॅक्टर चालकाला येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कारखाना व पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या वाहन चालकांना ताकीद देणे आवश्यक आहे.लोहारा तालुक्यातील लोकमंगल कारखाना ते खेड पाटी दरम्यान एक अपघात झाला आहे. रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला दुचाकीने जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अर्जून रघू पवार (वय २०) व मेघनाथ पवार (वय १२ ) रा. राजोळ जि. गुलबर्गा, कर्नाटक हे दोघे पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून लोकमंगल पेट्रोल पंपावर जात असताना रमणबाग जवळ नादुरूस्त होऊन रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. यात अर्जून पवार याचा जागीच मृत्यू झाला. तर मेघनाथ पवार हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे पाहून युवा सेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, परवेज तांबोळी, निळकंठ कांबळे यांनी त्यांचे वाहन थांबविले. त्यांना आपल्या स्वत:च्या वाहनातून लोहारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी अर्जून पवार याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. व मेघनाथ याच्यावर प्रथमोपचार करुन त्याला पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात हालविण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना रात्री दहाच्या दरम्यान मेघनाथ याचाही मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर बुधवारी (दि.१०) या दोघांची ही प्रेत त्यांच्या गावी राजोळ ( ता. अळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) येथे घेऊन गेले असून तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे समजते. मंगळवारी (दि. ९) सायंकाळी या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी विजय कोळी, शेळवणे, ढवण आदी घटना स्थळी दाखल झाले होते.