वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने सध्या ग्रामीण युवतींसाठी सौर पॅनेल जुळणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकारचे हे सौर विषयक नाविन्यपूर्ण प्रशिक्षण तालुक्यात प्रथमच घेण्यात येत आहे.तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात परिसरातील ग्रामीण युवतींसाठी दोन आठवड्यांच्या मोफत सौर प्रशिक्षण वर्गास नुकतीच सुरुवात झाली आहे. यात सौर पट्टिका (पॅनेल) जुळणी ही प्रामुख्याने शिकविण्यात येत आहे. जपानी सौरतज्ञ ताजिमा तोशिओ यांनी यापूर्वी हराळी विद्यालयाला भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधिनीने बनविलेल्या सौर लॅमिनेटरच्या आधारे हे सौर पट्टिका बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हराळी परिसरातील आठ महाविद्यालयीन युवती यात सहभागी झाल्या आहेत. किसन सूर्यवंशी व आकाश वलदोडे हे दोघेजण तज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देत आहेत. दोन आठवड्याचा हा प्रशिक्षण वर्ग पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सौर प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या युवतींनी ८८८८८०२६१४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कृषी पदविका विद्यालयाच्या प्राचार्या गौरी कापरे यांनी केले आहे. या प्रशिक्षणात प्राविण्य मिळविणाऱ्या निवडक प्रशिक्षणार्थींना ‘कमवा व शिका’ या योजनेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील टप्प्यात या प्रशिक्षणात सौर दिव्यांची जुळणीही करण्यात येणार आहे.
दोन आठवड्याचा हा प्रशिक्षण वर्ग पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सौर प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या युवतींनी ८८८८८०२६१४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कृषी पदविका विद्यालयाच्या प्राचार्या गौरी कापरे यांनी केले आहे.