वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबादचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी मटका जुगाराच्या दोन सुत्रधारांना उस्मानाबाद जिल्ह्यातुन 55 दिवसाकरीता हद्दपार केले आहे. शुक्रवारी (दि.11) ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून प्रेसनोटद्वारे मिळालेली माहिती अशी की, लोहारा तालुक्यातील माकणी येथील दिलीप विश्वंभर साठे उर्फ उमराव, वय 54 वर्षे व सतीश लक्ष्मण रजपुत, वय 43 वर्षे हे दोघे एकत्र येउन उपद्रवी टोळी करुन साथीदारांसह माकणी, सास्तुर, पेठसांगवी, लोहारा, जेवळी, कानेगाव तसेच आजुबाजूच्या गावात कल्याण व मुंबई मटका जुगार बुक्की चालवून त्याचे संयोजनकर्ते व सुत्रधार असून तो जुगार फोफावत असल्याने जुगार व्यसनाच्या आहारी जाउन अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. मटका व्यवसायामुळे त्यांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य जनता कंटाळली असून त्यांना प्रचलीत कायद्याची भिती अगर आदर न राहिल्याने लोहारा पोलीसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 55 अंतर्गत नमूद दोघांविरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावाची चौकशी उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी करुन अहवाल सादर केल्याने व समक्ष झालेल्या सुनावणीत मा. पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण, उस्मानाबाद श्री. अतुल कुलकर्णी यांनी दिलीप साठे व सतीश रजपुत या दोघांना शुक्रवारी दि. 11.11.2022 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातुन 55 दिवसाकरीता हद्दपार केले आहे. या काळात त्यांना न्यायालयाच्या किंवा सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेशिवाय जिल्ह्यात प्रवेश करता येणार नसून तसे केल्यास त्या आदेशाचा भंग ठरणार आहे.