लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. २०) या सप्ताहास सुरुवात होणार असून दि. २६ रोजी श्री च्या काठीची सवाद्य मिरवणूक व सायंकाळी ५ च्या सुमारास काल्याचा कार्यक्रम होणार आहे.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त दरवर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी (दि. २०) या सप्ताहास सुरुवात होणार आहे. या सप्ताह कालावधीत पहाटे चार ते सहा काकडा आरती, सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी चार ते पाच प्रवचन, पाच ते सहा हरिपाठ तर रात्री नऊ ते साडे अकरा या कालावधीत कीर्तन आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. दि. २६ रोजी श्री च्या काठीची सवाद्य मिरवणूक व सायंकाळी ५ च्या सुमारास काल्याचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम बुधवारी (दि. २७) होणार आहेत. शेवटच्या कुस्तीतील विजेत्या मल्लास रु. पंधरा हजार एक व चांदीची गदा देण्यात येणार आहे. मठाधिपती गुरुवर्य शामचैतन्य महाराज माकणीकर व महेश महाराज माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहातील कार्यक्रम होणार आहेत.