वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांचा निवडणुक कार्यक्रम सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. १०) एकूण ८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे लोहारा नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागासाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
लोहारा नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या प्रभागाची निवडणूक स्थगित केली. त्यामुळे लोहारा नगरपंचायत निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या चार प्रभागाची वगळता उर्वरित १३ प्रभागातील निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर उर्वरित चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या चार जागांसाठी ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. परंतु छाननी प्रक्रियेत यापैकी २३ उमेदवारी अर्ज अवैध झाले होते. त्यामुळे चार जागेसाठी २२ उमेदवार रिंगणात होते. या चार जागांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त होती. त्यामुळे आपल्या पक्षाची अधिकृत उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. त्यामुळे पक्षाची उमेदवारी न मिळालेले इच्छुक अपक्षाचा झेंडा हाती घेऊन निवडणूक रिंगणात उतरले होते. सोमवारी (दि. १०) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे पक्षातील नाराजांनी दाखल केलेले अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी त्या त्या पक्षातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दुपारी ३ पर्यंतची वेळ होती. त्यामुळे तहसील कार्यालय परिसरात राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी होती. अखेर ८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता चार जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन आघाडी केली आहे. तर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत आहे. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यामुळे या चार जागेच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार फिल्डिंग लावण्याची शक्यता आहे. या चार जागांसाठी दि. १८ जानेवारीला मतदान पार पडल्यानंतर दि. १९ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीदरम्यान पुन्हा एकदा राजकीय पक्षांकडून प्रचारयंत्रणा राबविली जाईल. त्यामुळे लोहारा शहरात पुन्हा एकदा राजकीय दंगल पाहायला मिळणार आहे.
————–
उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले उमेदवार –
वर्षाराणी विनोद लांडगे, राधाबाई अजित घोडके ( प्रभाग ८), विरेंद्र नरुणे, दयानंद स्वामी, श्यामसुंदर नारायणकर (प्रभाग १०), महेबूबपाशा सुंबेकर (प्रभाग १६), शितल संदीप माळी, हानिफाबी महेबूब गवंडी (प्रभाग १७)