वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. १३) एकूण १० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे लोहारा नगरपंचायतीच्या १३ जागासाठी ४४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
लोहारा नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या प्रभागाची निवडणूक स्थगित केली. त्यामुळे लोहारा नगरपंचायत निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या चार प्रभागाची वगळता उर्वरित १३ प्रभागातील निवडणूक सुरू आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करून निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केला होता. परंतु शेवटच्या क्षणी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या इच्छुकामध्ये नाराजी पसरली. जागावाटप झाल्याप्रमाणे ज्या ठिकाणी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराला ए बी फॉर्म दिला नाही तसेच ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार आहे त्याठिकाणी शिवसेनेने त्यांच्या उमेदवाराला ए बी फॉर्म दिला नाही. परंतु दोन्ही पक्षातील इच्छुकांची मनधरणी करून त्यांचे उमेदवारी अर्ज माघारी घेणे आवश्यक असल्याने दोन्ही पक्षातील प्रमुख नेते कार्यकर्ते मागील तीन चार दिवसांपासून कामाला लागले होते. यात काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी उमेदवारी अर्ज कायम राहिले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी (दि. १३) दुपारी ३ पर्यंतची वेळ होती. त्यामुळे तहसील कार्यालय परिसरात राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी होती. लोहारा नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार असे एकूण ५४ जण निवडणूक रिंगणात होते. अखेर यापैकी १० जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १३ जागांसाठी ४४ जण नशीब आजमावत आहेत. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस (आय) ने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्याप्रमाणे सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत तर भाजपाने त्यांचे अपक्ष उमेदवार उभे केले आहेत.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च दररोज निवडणूक विभागास सादर करावा तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार माने यांनी केले आहे. लोहारा नगरपंचायत निवडणुकीसाठी दि. २१ रोजी मतदान होणार आहे.
—————
उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले उमेदवार –
कोंडाबाई भगवान चपळे ( प्रभाग १), श्रीशैल्य पंचय्या स्वामी (प्रभाग ३), स्वप्नील अरुण माटे (प्रभाग ५), फेरोजाबी हबीब सुंबेकर, वर्षाराणी विनोद लांडगे (प्रभाग ६), महानंदा तमनाप्पा घोंगडे, रेणुका चनबसप्पा घोंगडे, आरती ओम कोरे (प्रभाग ९), जनक गोविंद कोकणे , विकास ज्ञानेश्वर नारायणकर (प्रभाग १२)