वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा – सुमित झिंगाडे
लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी (दि. 30 ) क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन लोहारा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एस.के. नरवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पो.उ.नि. गुलजरखान पठाण, युवा सेनेचे लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, एम.के. कोळी, पालक प्रतिनिधी शिवराज झिंगाडे, स्कूलचे प्राचार्य शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्कूलमधील उपस्थित विद्यार्थ्यांना नरवडे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, एक उत्तम व कसलेला खेळाडू कधीही आत्महत्या करत नाही. याउलट प्रतिकूल परिस्थितीत हारत असलेला सामना वा स्पर्धेत यशस्वी कसे व्हायचे हे पाहून समाजातील इतरांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे असे मार्गदर्शन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी प्राचार्य जाधव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, जीवनात आपणास यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाने आपले मन, मेंदू व मनगट निरोगी, सुदृढ व बळकट करायला हवे.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील खेळाडूची शपथ घेतली. यावेळी व्यंकटेश पोतदार, सोमनाथ कुसळकर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सिद्धेश्वर सुरवसे, प्रेमचंद राठोड, स्वामीनी होंडराव, निलोफर बागवान, चांदबी चाऊस, सरिता पवार, मीरा माने, संतोषी घंटे, माधवी होगाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कुलच्या संचालिका सविता जाधव यांनी तर मयुरी नारायणकर यांनी आभार मानले.