वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
बदलत्या जीवनशैलीमुळे, व्यायामाच्या अभावामुळे, बदलत्या आहारामुळे, मधुमेह, रक्तदाब या सारख्या छुप्या आजारांचा शरीरात शिरकाव होतो. जो लवकर लक्षात येत नाही. यासाठी ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूर व ग्लोबल जीन कार्पोरेशन मुंबई यांच्या सहकार्याने मोफत रोग तपासणी शिबीर आयोजित केले आहे. त्याचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन सास्तूर येथील जेष्ठ नागरिक रावसाहेब पाटील यांनी केले.
ग्लोबल जीन कॉर्पोरेशन मुंबई व ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूरच्या वतीने परिसरातील नागरिकांची दि. १८ ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीत मधुमेह, किडनी, ह्रदयविकार, यकृत, थायरॉईड इत्यादीसाठी ३३ प्रकारच्या विविध मोफत तपासण्या करण्यात येणार आहेत. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्शचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. ते म्हणाले कि, मधुमेहाचे दुष्परिणाम संथ गतीने वाढत असतात. त्यामुळे ह्र्दय, यकृत, किडनी, थायरॉईड इ. आजार निर्माण होतात. यासाठी पुढील काळात सास्तुरच्या घराघरातील १८ वर्षावरील व्यक्तीची मधुमेह, रक्तदाब यांची तपासणी करून प्रत्येक व्यक्तीचे ग्रामीण रुग्णालय स्पर्श मार्फत हेल्थ कार्ड बनवण्यात येईल. ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या माहितीचे साँफटवेअर बनवून दुर्धर आजारांवर उपचार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या शिबिराबद्दल डॉ. नंदकुमार पाणसे यांनी माहिती दिली. ग्लोबल जीन कार्पोरेशन मुंबई मार्फत अनुवंशिकतेबद्दल करण्यात येत असलेल्या संशोधनाबद्दल त्यांनी माहिती दिली. या तपासणीचा उद्देश सांगताना ते म्हणाले की, बाइल डक्ट मधून इन्सुलिन रक्तात मिसळते व शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवते. हे इन्सुलिनचे प्रमाण कमी जास्त झाल्यास मधुमेह होतो. या बद्दल ज्या तपासण्या केल्या जाणार आहेत. त्यात मागील तीन महिन्यातील शरीरातील साखरेचा रेशो काढला जातो. या शिवाय, यकृत संबधी १० प्रकारच्या ह्रदयासंबधी ७ प्रकारच्या, किडनी संबंधी ५ प्रकारच्या थायरॉईड संबधी ३ प्रकारच्या व इतर ३३ प्रकारच्या मोफत तपासण्या करण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. मोफत तपासण्याचा गावकर्यांनी लाभ घेण्यास आवाहन त्यांनी केले.
या शिबिरात येताना पूर्वीचे रिपोर्ट डॉक्टरांनी दिलेली औषधाची चिठी किंवा औषधे सोबत आणावीत तसेच, आधार कार्ड किंवा ओळख पत्र सोबत घेऊन येण्याबद्दल त्यांनी सांगितले. तपासण्याचे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर रुग्णांना सास्तुरच्या सभागृहात मधुमेह तज्ञ व इतर तज्ञा मार्फत मार्गदर्शन/ सल्ला व उपचार केले जातील असे त्यांनी सांगितले. तसेच दि. १८ ते २२ जानेवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या या शिबिराचा जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सास्तुरचे जेष्ठ नागरिक रावसाहेब पाटील, नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. नंदकुमार पाणसे, सास्तुरचे उपसरपंच मिथुन कुर्ले, माजी सरपंच विजयकुमार क्षीरसागर, माजी सरपंच यशवंत कासार तसेच ग्लोबल जीन कार्पोरेशन मुंबईचे कॅप कॉओर्डीनेटर गौरव शिंदे, अमोल राउत, किरण रेमाजे, हैदर रस्सिवाला, मो.नदीम, मोहन डीगोळे व ग्रामीण रुग्णालय स्पर्शचे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत आदटराव यांनी केले.