वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने दि. 8 मार्च ते 5 जून दरम्यान राबविण्यात असलेल्या महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान कालावधीत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सुरू असलेल्या महिला बचत गटांकडून, ग्रामसंघाकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत असून या विविध उपजीविका उपक्रमातून ग्रामीण भागातील महिला आर्थिक सक्षम होण्यास मदत होत आहे.
उमेद महिला बचत गटांमार्फत विवध शासकीय योजना यशस्वीपणे राबवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यसाठी शासनाच्या कृतिसंगम कार्यक्रमातून उमेद बचत गटाच्या माध्यमातून शासकीय योजनांची सांगड घालून कृतिसंगम कार्यक्रम राबविण्याबाबत शासनाकडून महिलां बचत गटांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यांचाच एक भाग म्हणून आज निलंगा तालुक्यात बामणी, निटूर , औराद व माळेगाव या 4 गावात घरकूल मार्टचा शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या इंदिरा आवास, रमाई आवास , शबरी आवास आशा विविध घरकुल योजनेच्या लाभार्थीना सर्व बांधकाम साहित्य हे गावातच उपलब्ध होणार आहे. सदर घरकुल मार्ट हे त्या त्या गावातील उमेद गट व ग्रामसंघाकडून चालविण्यात येत आहेत. या घरकुल मार्ट मधून सिमेंट, वाळू,स्टील, शौचालय भांडे, विटा व इतर आवश्यक बांधकाम साहित्य गावातच उपलब्ध होणार असून परिसरातील अनेक गावांना याचा चांगला फायदा होणार आहे. यामुळे घरकुल लाभार्थींच्या वाहतुकीच्या खर्चात बचत होणार आहे. सदर घरकुल मार्ट हे बामणी येथील क्रांतीयुग महिला बचत गट, निटूर येथील गुलजार महिला बचत गट, माळेगाव येथील राजमाता महिला ग्रामसंघ व औराद येथील सबका साथ महिला बचत गट यांचेकडून सुरू करण्यात आलेले आहेत. गावातील व आसपासच्या गावातील सर्व घरकुल लाभार्थींनी या घरकुल मार्ट मधून बांधकाम साहित्याची खरेदी करावी असे आवाहन गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी केले आहे.
पंचायत समिती सभापती राधा बिराजदार यांनी सर्व घरकुल मार्ट उपक्रमाचे कौतुक केले. सर्व महिलांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे. दि. 3 मे रोजी गावातील सरपंच मान्यवरांच्या हस्ते घरकुल मार्टचा शुभारंभ करण्यात आला. घरकुल मार्ट करण्यासाठी प्रभाग समन्वयक संतोष पालखे,नितीन रोडे, सच्छितानंद आयनिले व लिंबराज कुंभार यांनी पुढाकार घेतला. सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांच्या नेतृत्वाखालील तालुका व्यवस्थापक अरुण शाहीर व शरद समुखराव यांनी केले.
No Result
View All Result
error: Content is protected !!