वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीरपर्यंत विविध वेळेला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये मध्यरात्री साधारणतः २:२१ वाजता कोल्हापूरच्या पूर्वेस सुमारे १७१ किलोमीटरच्या परिसरात ३.९ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर पहाटे ३:२८ वाजता जम्मू-काश्मीरला ३.४ इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. याबाबतची अधिकृत माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ने दिली आहे.
सदर भूकंपाचे कनेक्शन अफगाणिस्तान पर्यंत असल्याचे सांगितले जाते आहे. काबूल शहरामध्ये मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास ४.३ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. तीनही भागांमध्ये जाणवलेल्या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली विविध अंतरावर होते. अफगाणिस्तान येथे झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ८० किलोमीटर इतक्या अंतरावर होता. महाराष्ट्रात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली १० किलोमीटर अंतरापर्यंत होता.
जम्मू-काश्मीरमध्ये कटरा जिल्ह्याच्या ६२ किलोमीटर अंतरावर ईशान्य – उत्तर दिशेला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५ किलोमीटर अंतरावर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भूकंपामुळे झालेल्या जीवित अथवा मालमत्ताहानी बाबतीत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप तरी पुढे आली नाही.