वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आपल्या गावाचा विकास करून गावातील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक एकमेकांसोबत राहून गावाचा सर्वांगीन विकास केला पाहिजे असे प्रतिपादन भास्करराव पेरे पाटील यांनी गुरुवारी ( दि. १९) लोहारा येथे आयोजित कार्यक्रमात केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार व लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात कोविड १९ काळात आपल्या जीवाची बाजी लावून गाव सुरक्षित ठेवणाऱ्या सरपंचांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भास्करराव पेरे पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागन्ना वकील होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी व्यसनमुक्ती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संदीप तांबारे, धनेश्वरी शिक्षण संस्थेचे प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोर साठे, वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना पेरे पाटील म्हणाले की, गावाचा विकास करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांची भूमिका महत्त्वाची आहे. मी आमच्या पाटोदा गावचा २५ वर्षे सरपंच होतो. ज्यावेळी मी सरपंच झालो, त्यावेळी गावातील नागरिकांना काय आवश्यक आहे त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. जर आपले राज्य, देश समृद्ध व्हायचे असेल तर पहिल्यांदा गावांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे सांगत विविध प्रकारचे किस्से सांगून गावाचा कारभार करताना काय काय करावे लागते याचे मार्गदर्शन भास्करराव पेरे पाटील यांनी उपस्थित सरपंचांना केले. तसेच पैसा म्हणजेच सर्वस्व नसून आपण जाताना सोबत काहीच घेऊन जाणार नाही. त्यामुळे आपण गावातील लोकांची सेवा करणे हाच उद्देश ठेवून काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोविंदराव साळुंके, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके, जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, माजी जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, बाबासाहेब जाधव, तालुका कार्याध्यक्ष अमोल ओवांडकर, दादासाहेब जानकर, तालुका उपाध्यक्ष प्रशांत सोमवंशी, अभिजित लोभे, सलमान सवार, अजित जाधव, विठ्ठल बुरटूकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मुक्तार चाऊस, माजी नगरसेवक गगन माळवदकर, प्रकाश भगत, विद्यार्थी तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, संजय जाधव, राजपाल वाघमारे, प्रविण पाटील, मनोज पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश पाटील, सचिन रणखांब यांनी तर ऍड. दादासाहेब जानकर यांनी आभार मानले.रांगोळीतून अनोख्या शुभेच्छा
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील यांनी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. त्यांनी कळंब येथील एक उत्कृष्ठ कलाकार राजकुमार कुंभार यांना बोलावून त्यांच्याकडून सुरेशदाजी बिराजदार यांच्या फोटोची हुबेहूब रांगोळी काढली होती. ही रांगोळी उपस्थित सर्वांचे आकर्षक ठरले होते.