उमरगा प्रतिनिधी / अमोल पाटील
उमरगा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज काढून घेण्याच्या शेवटच्या दिवशी दि. ७ रोजी सरपंच पदासाठी ६९ उमेदवार रिंगणात आहेत. तर सदस्य पदासाठी २९ उमेदवार बिनविरोध निघाल्याने ४९१ उमेदवार आपले नशीब आजमावणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी बिनविरोध निघणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आवाहन केले होते. या आवाहनाकडे गाव पुढाऱ्यांनी पाठ फिरवल्याने तालुक्यातील एकही ग्रामपंचायत बिनविरोध निघू शकली नाही.
उमरगा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीमध्ये १२२ जणांचे सरपंच पदाचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ५३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ६९ उमेदवार ग्रामपंचायतीचा जनतेतून सरपंच होण्यासाठी रिंगणात उतरले आहेत तर सदस्य पदासाठी ६९० उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते त्यापैकी ५ अर्ज अवैध ठरले होते . उर्वरीत ६८५ पैकी १६५ जणांनी उमेदवारीतुन माघार घेतल्याने ५२० उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब आजमावणार आहेत. कोथळी, चिंचोली भुयार ,औराद, कोराळ, माडज, मळगी, मळगीवाडी या सात ग्रामपंचायत मधील सदस्य पदाच्या २९ उमेदवारां
विरोधात उमेदवार नसल्याने हे सदस्य बिनविरोध असल्याने त्यांचा सदस्य पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गावातील भाऊबंदकीचे वाद होऊ नये व गावाचा विकास व्हावा या बाबी लक्षात घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निघाल्यास पंचवीस लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार असल्याने ग्रामपंचायत बिनविरोध काढावी असे आवाहन केले होते. या आवाहनाकडे गाव पुढाऱ्यांनी पाठ फिरवल्याने गावातील पारंपारिक सत्ता संघर्ष व राजकीय अस्तित्व याला प्राधान्य देत ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात आपला शड्डू ठोकला आहे.
मागील कार्यकाळात राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या कोराळ व भुयार चिंचोली ग्रामपंचायतीमध्ये कोराळ मधील ९ पैकी ६ तर भुयार चिंचोली मध्ये ११ पैकी ७ सदस्य पदाचे उमेदवार ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून दिले आहेत. तर कोथळीत ११ पैकी ३, औराद मध्ये ९ पैकी ४, माडज मध्ये ११ पैकी ५, मळगीमध्ये ९ पैकी १, मळगीवाडी मध्ये ७ पैकी ३ सदस्य बिनविरोध निघाले आहेत.
सुंदरवाडी येथे सरपंच पदासाठी सर्वाधिक ६ तर माडज ५, एकुरगा ५ उमेदवार रिंगणात असून सदस्य पदासाठी आलूर येथे १७ जागेसाठी सर्वाधिक ५३, येणेगुर येथे १५ जागेसाठी ५२, एकुरगा येथे ११ जागेसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंच पदासाठी माडज आणि एकुरगा येथे पंचरंगी, आलूर आणि नारंगवाडी येथे चौरंगी, आनंदनगर, केसरजवळगा, कोराळ, येणेगुर, औराद, धाकटीवाडी, कोथळी, बेळंब, आणि भुसणी येथे तिरंगी लढत होणार असून कंटेकुर, चिंचोली जहागीर, त्रिकोळी, चिंचोली भुयार, मळगी, वरनाळवाडी, मळगीवाडी, महालिंगरायवाडी येथे दुरंगी सरळ लढत होणार आहे.