वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कृषीच्या आत्मा विभागाच्या सहकार्याने निलंगा तालुक्यातील उमेदच्या गटांना बुधवारी (दि.२७) परसबाग भाजीपाला लागवडीसाठी ५०५ बियानांचे किट वाटप करण्यात आले.
उमेद महाराष्ट्र ग्रामीण जिवनोन्नती अभियानाच्या वतीने लातूर जिल्ह्यात दि. ५ ते २१ जुलै या कालावधीत आरोग्यादायी पोषणबाग निर्मिती अभियान राबविण्यात आले. ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांचा आरोग्य स्तर उंचवावा, महिलांच्या आहारात नियमितपणे भाज्यांचा समावेश व्हावा व त्यातून सदृढ आरोग्य लाभावे तसेच गाव स्तरावर या भाज्यांची निर्मिती करून भाजीपाल्यावरील खर्चात बचत व्हावी आणि भाजीपाला विक्री करून उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने अभियानाच्या वतीने कृतीसंगम प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, प्रकल्प संचालक प्रभू जाधव, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांच्या प्रेरणेतून या परसबाग मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. निलंगा तालुक्यात ११६ ग्रामपंचायतमध्ये उमेद अंतर्गत एकूण ३ हजार गट कार्यरत असून परस बाग मोहीम कालावधीत तयार करण्यात आलेल्या एकूण ५०५ बचतगटांना परस बागेसाठी कृषी विभाग निलंगा आत्मा प्रकल्प तर्फे पंचायत समिती निलंगा येथे भाजीपाला बियाणे किटचे वाटप करण्यात आले. प्रकल्प संचालक आत्मा लातूर दत्तात्रय गावसाने यांचा सहकार्याने तसेच गटविकास अधिकारी अमोल ताकभाते , तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या बियाणे किट वाटपाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी आरोग्यदायी परस बागेचे महत्त्व उपस्थित महिलांना सांगून या परसबागेचे संवर्धन करावे असे प्रतिपादन केले. यावेळी तालुका कृषी तंत्र व्यवस्थापक करमचंद राठोड यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक कृषी तंत्र व्यवस्थापक तुकाराम सुगावे व तालुका व्यवस्थापक अरुण शाहीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्रभाग समन्वय लिंबराज कुंभार, नितिन रोडे, सच्छितानंद आयनिले, त्रिंबक लहाने , गोविंद रावते, उमा कोरे, वर्षा फुटाणे व प्रशांत चिलमे यांनी केले. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व सीटीसी, कृषी सखी, पशु सखी व सीआरपी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.