वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
हॅलो मेडिकल फाऊंडेशन, अणदूर संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी (दि.८) एकल महिलांचा मेळावा घेण्यात आला. लोहारा तालुक्यातील १५ गावातील ८० एकल महिला या मेळाव्यास उपस्थित होत्या. तालुक्यातील मुर्षद्पूर येथे तालुका संरक्षण अधिकारी रवी धनवे यांनी उपस्थित महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा बाबत माहिती देवून महिलांनी निर्भयपणे पुढे येऊन संरक्षण कक्षास संपर्क करण्याचे आवाहन केले. यावेळी हॅलो मेडिकल फाऊंडेशनच्या निर्धार समानतेचा प्रकल्पाचे समन्वयक सतिश कदम यांनी या एकल महिलांशी संवाद साधून गट चर्चेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न समजून घेतले व महिलांचे प्रश्न कमी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी मुर्षद्पूरच्या पोलीस पाटील मनिषा चाकुरे उपस्थित होत्या. लोहारा येथे झालेल्या कार्यक्रमात सखी वन स्टाँप सेंटर उस्मानाबादच्या विधिज्ञ प्रियंका जाधव यांनी कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा २००५ बाबत महिलांना सविस्तर मार्गदर्शन करून पिडीत महिलांनी सखी वन स्टाँप सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसवराज नरे, श्रीकांत कुलकर्णी व वैजनाथ लोहार यांनी विशेष प्रयत्न केले.