वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरासह कानेगाव परिसरात मंगळवारी (दि.३०) रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे लोहारा शहरातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले होते. लोहारा येथे तब्बल १२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी (दि. ३०) लोहारा शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी ७ च्या सुमारास लोहारा व परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. दरम्यान विजांचा कडकडाट सुरू होता. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. हा पाऊस रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होता. जवळपास दोन तास झालेल्या या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसामुळे शहरातील अनेक घरात पाणी शिरले होते. घरात पाणी शिरल्याने घरात ठेवलेल्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक ३, ४, ७, ११, १४, १७ येथील अनेक घरात पाणी शिरले होते. या पावसामुळे बसस्थानका जवळील ओढा प्रवाहित झाला होता. या ओढ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने कानेगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी जात होते. त्यामुळे हा रस्ता काही काळ बंद होता. या जोरदार पावसा दरम्यान रात्री ७ च्या सुमारास शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. हा वीजपुरवठा बुधवारी (दि.३१) सकाळी दहाच्या दरम्यान म्हणजे तब्बल १५ तासानंतर सुरळीत झाला.
तालुक्यातील कानेगाव येथेही मंगळवारी (दि.३०) रात्री ८.३० च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास ४० मिनिटे जोरदार पाऊस झाला. तसेच लोहारा (खुर्द) येथेही जोरदार पाऊस झाला. या ठिकाणच्या कारभारी वस्ती वरून शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे.
या पावसामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोहारा येथे मंगळवारी तब्बल १२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दोन तासात तब्बल १२७ मिमी पाऊस होण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.