वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी (दि. ३०) लोहारा शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी ७ च्या सुमारास लोहारा व परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. दरम्यान विजांचा कडकडाट सुरू होता. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. हा पाऊस रात्री वाजे पर्यंत सुरू होता. जवळपास दोन तास झालेल्या या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
कानेगाव परिसरात अतिवृष्टी ?
तालुक्यातील कानेगाव येथे रात्री ८.३० च्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. जवळपास ४० मिनिटे हा पाऊस सुरू होता. कानेगाव परिसरात झालेल्या या जोरदार पावसामुळे अतिवृष्टी झाल्याचे काहींनी सांगितले आहे.
माकणी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर
सोमवारी (दि.२९) माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातील पाणीसाठा ९५ टक्क्यांच्या जवळपास होता. मंगळवारी लोहारा तालुक्यासह परिसरात झालेल्या या जोरदार पावसामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. रात्री पावसाचा जोर असाच राहिला तर सकाळी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.