वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
फुलवाडी टोलनाका ते तलमोड टोलनाका दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ठ झाले आहे. अनेक उड्डाणपुलाचे काम झाले नाही. तरीही फुलवाडी व तलमोड या दोन ठिकाणी टोलनाके उभा करून वाहनचालकांकडून लाखो रुपयांची लूट केली जात आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम तात्काळ करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात तसेच जोपर्यंत सदरील कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत दोन्ही टोलनाके बंद करण्यात यावेत अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. लोहारा तहसीलदार यांच्यामार्फत बुधवारी (दि.२०) हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम संथ गतीने चालू असल्याने हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. मागच्या आठ वर्षांपासून अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तसेच या मार्गावर फुलवाडी टोल नाका ते तलमोड टोल नाका यादरम्यान अनेक उड्डाणपुलाचे काम झालेच नाहीत व जो रस्ता तयार करण्यात आला आहे. तो एकदम निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होऊन शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेक नागरिकांना कायमचे अपंगत्व आले आहे.
असे असतानाही या महामार्गावर फुलवाडी व तलमोड या ठिकाणी दोन टोल नाके तयार करून वाहन चालकांकडून लाखो रुपयांची लूट केली जात आहे. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून या महामार्गासंबंधात तात्काळ दखल घेऊन या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात. तसेच जोपर्यंत या महामार्गावरील सर्व उड्डाणपुलाचे व नळदुर्ग बायपासचे काम पूर्ण होत नाही व महामार्गावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता सुरळीत होत नाही. तोपर्यंत फुलवाडी व तलमोड टोलनाके बंद करण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच या मागणीसाठी फुलवाडी टोल नाका ते तलमोड टोल नाका दरम्यान येणाऱ्या सर्व ग्रामस्थ, राजकीय पक्ष, वाहन चालक, सामाजिक संघटना, वाहतूक संघटना यांच्या वतीने बुधवार दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता लोहारा तालुक्यातील आष्टामोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मनसेचे विधानसभा अध्यक्ष शाहूराज माने, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, खंडू जाधव, शिवराज चिनगुंडे आदींसह अनेकांच्या सह्या आहेत.