लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा महोत्सवास मंगळवारी (दि. २६) सुरुवात झाली आहे. यावेळी श्री सिध्देश्वर दर्शन व काल्याच्या कार्यक्रमासाठी माकणीसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. बुधवारी (दि. २६) दुपारी कुस्त्याचा जंगी फड रंगणार आहे.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर येथे दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात दि. २० पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. या यात्रे दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी ( दि.२६) येथिल विठ्ठल रुक्मीणी मंदिरापासून श्री सिध्देश्वर मंदिरापर्यंत गावातील मुख्य रस्त्याने ढोल ताशा, हलगी, टाळ मृदंगाच्या गजरात श्री च्या काठीची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सायंकाळी ५ च्या दरम्यान सिद्धेश्वर मंदिर परिसरात आली. त्यानंतर शिऊर ( ता. औसा ) येथील श्री वीरभद्रप्पा स्वामी शिऊरकर, मठाधिश शामचैतन्य महाराज, महेश महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत काल्याच्या वाटपाने मिरवणूकीचे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी पहाटेपासूनच मंदिरात सिध्देश्वराच्या अभिषेक व दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या यात्रा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला कुस्तीचा जंगी फड बुधवारी( दि. २७) होणार आहे. यासाठी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत कार्यालय व गावातील कुस्तीगीराकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या यात्रेत लहान मुलांच्या मनोरंजनासाठी रहाट पाळणे यासारखे अनेक मनोरंजनाची साधने आली आहेत. याबरोबरच केळी, गृहपयोगी वस्तू, खेळणी, हॉटेल, गिरके आदी व्यापारीही त्यांची दुकाने घेवून मोठ्या संख्येने आली आहेत.
ही यात्रा पुर्वीपासून केळीच्या व्यापारासाठी प्रसिध्द आहे. या यात्रेदरम्यान केळीच्या व्यापारातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. यामुळे परिसरातील केळीचे व्यापारी मोठ्या संख्येने येतात. यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.