वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा महोत्सवाला बुधवारी (दि. ७) प्रारंभ झाला आहे. यात्रेनिमित्त सिध्देश्वर दर्शन व काल्याच्या कार्यक्रमासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर येथे दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात गुरुवार ( दि. १) पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. बुधवारी ( दि. ७) येथिल विठ्ठल रुक्मीणी मंदिरापासून श्री सिध्देश्वर मंदिरापर्यंत गावातील मुख्य रस्त्याने टाळ मृदंगाच्या गजरात श्री च्या काठीची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काला वाटपाच्या कार्यक्रम झाला. बुधवारी पहाटेपासूनच मंदिरात सिध्देश्वराच्या अभिषक व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर गुरुवारी (दि.८) या यात्रा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला कुस्तीचा जंगी फड होणार आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी तालुक्यासह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, पुणे आदी ठिकाणाहुन अनेक मल्ल येतात. या कुस्ती स्पर्धेतील अंतिम कुस्तीसाठी १५ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
यासाठी यात्रा कमिटी व गावातील कुस्तीगीराकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त अनेक व्यापा-यांनी दुकाने थाटली आहेत. तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी रहाट पाळणे, मौतका कुआ यासारखे अनेक मनोरंजनाची साधने आली आहेत. याबरोबरच केळी, गृहपयोगी वस्तू, खेळणी, हॉटेल, गिरके आदी व्यापारीही त्यांची दुकाने घेवून मोठ्या संख्येने आली आहेत. ही यात्रा पुर्वीपासून केळीच्या व्यापारासाठी प्रसिध्द आहे. या यात्रेदरम्यान केळीच्या व्यापारातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. यामुळे परिसरातील केळीचे व्यापारी मोठ्या संखेने येतात. यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.