वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबादचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेला (ठाकरे गट) हा मोठा धक्का असणार आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील आ. ज्ञानराज चौगुले व आ. तानाजी सावंत हे दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहिले होते. त्यावेळी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते. परंतु आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी प्रा. रवींद्र गायकवाड यांनी भेट घेतली आहे. यावेळी आपण पक्षाचे काम करत राहा, आपणास सन्मानपूर्वक वागणूक मिळेल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी ग्वाही दिल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, खा. प्रताप जाधव, खा. श्रीरंग बारणे, आ. संजय सिरसाट आदी उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हे शिंदे गटात दाखल झाले असल्याची जोरदार चर्चा होत आहे. जर माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड शिंदे गटात सामील झाले तर उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेला हा खूप मोठा धक्का राहणार आहे.