वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील दोन तीन महिन्यांपूर्वी लोहारा ते करजखेडा रस्त्याचे काम करण्यात आले आहे. परंतु सदरील रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. या रस्त्याच्या काही भागाची अत्यंत दुरवस्था झालेली असतानाही त्याठिकाणी काम करण्यात आले नाही. त्यामुळे या ठिकाणी लहान मोठे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे.
लोहारा ते करजखेडा या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले होते. मागील दोन तीन महिन्यांपूर्वी या १२ किमी रस्त्यापैकी बहुतांश रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. परंतु अद्याप जवळपास ४ किमी रस्त्याचे काम झालेले नाही. या चार किमी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. तरीही हा रस्ता दुरुस्ती चे काम का केले जात नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या रस्त्यावरील खड्यांमुळे लहान मोठे अपघात घडत आहेत. तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
लोहारा करजखेडा या रस्त्याची अवस्था मागील दोन तीन वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली होती. रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता हेच समजत नव्हते. त्यामुळे वाहनधारकांना एक खड्डा चुकवल्यानंतर दुसरा खड्डा चुकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. या रस्त्यावर सतत दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. लोहारा शहरातून लातूर, उस्मानाबाद, सोलापूर करिता जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या खराब रस्त्यामुळे प्रवासी वैतागून गेले होते. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी अनेकदा आंदोलने झाली. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. काम सुरू झाल्याने प्रवासी व वाहनधारकातून समाधान व्यक्त करण्यात येत होते.
परंतु लोहारा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या मार्डी गावापर्यंत दुरुस्ती करण्यात आली. तर त्यापुढे करजखेडा गायरान वस्तीपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. तसेच करजखेडा गायरान वस्तीपासून पुढे करजखेडा चौरस्त्या पर्यंत चे काम करण्यात आले. विशेष म्हणजे मार्डी गावच्या पुढून करजखेडा गायरान वस्तीपर्यंतच्या रस्त्याचीच मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. तरीही याच रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने उर्वरित रस्त्याचे तात्काळ करावे अशी मागणी प्रवासी व वाहनधारकातून केली जात आहे.