वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यात मागील दोन दिवसांपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तालुक्यातील राजेगाव, एकोंडी, रेबे चिंचोली परिसरात झालेल्या अतिवृष्टी व माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे तेरणा नदी पात्रा जवळील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी शनिवारी (दि.२२) या नुकसानीची पाहणी केली.
तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात सोडण्यात येणारे अतिरिक्त पाणी सोडल्याने राजेगाव नदीपात्रा शेजारील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सोयाबीन व ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. उमराव मोरे हे वयस्कर व्यक्ती या पुरात वाहून गेल्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली. या नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे प्रा. बिराजदार यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी माकणी येथील निम्नतेरणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त पाणी सोडत असताना याची पूर्वकल्पना देण्यात यावी, तसेच अतिरिक्त पाणी एकदम न सोडता थोड्या थोड्या प्रमाणात सलग सोडावे, यामुळे पाणी वाढून नदीपात्राच्या परिसरात शेतीचे नुकसान होणार नाही, नदीपात्राचे खोलीकरण करण्यात यावे अशा महत्त्वाच्या मागण्या केल्या. या सर्व मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, राजेगावचे सरपंच सुरेश देशमुख, सचिन देशमुख, अभिमन्यू देशमुख, रणजित पाटील, अविनाश देशमुख, सुनील देशमुख, प्रताप देशमुख, अशोक सुरवसे, विठ्ठल देशमुख, गौतम घंटे, शाहुराज देशमुख, महेश स्वामी, अमर बिराजदार, अजित पाटील, योगेश घंटे, सरपंच गोकुळ मोरे, उपसरपंच पवन मोरे, भालचंद्र मोरे, राजेंद्र मोरे, प्रवीण पाटील, नरेंद्र पाटील अतुल देशमुख, विष्णू माने, अजित देशमुख, ज्ञानेश्वर कसपटे, बळीराम देशमुख, अशोक देशमुख, शाहूराज देशमुख, सचिन रणखांब आदींसह शेतकरी उपस्थित होते.