वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शेतकऱ्यांनी लोकमंगल कारखान्याला दिलेल्या ऊसाचे बिल दिले गेले नाही. त्यामुळे कारखाना प्रशासनाने २५ जुलै पर्यंत शेतकऱ्यांना बिल दिले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कारखान्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. गुरुवारी (दि.१५) तहसीलदार संतोष रुईकर यांना हे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यापूर्वी ३० जून रोजी निवेदन दिले होते. या निवेदनात म्हटले होते की, घराघरात कोरोनाचे पेशंट निघत असताना शेतकऱ्यांना खाजगी सावकारांचे उंबरठे झिझवावे लागले. परंतु पोटाला चिमटा मारून कष्टाने पिकवलेल्या ऊसाचे पैसे मिळालेच नाहीत. आता पेरणीसाठी उदारीने बि – बियाणे, खते किटकनाशके सारख्या इतर बाबीसाठी बळीराजा हवालदिल झाला आहे. उस्मानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी देशात आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. पुढील दहा दिवसांत शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे मिळाले नाही तर या अन्यायाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने कारखाण्याविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. परंतु त्यानंतर कारखाना प्रशासनाकडून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये १५ जुलै पर्यंत आम्ही बिले काढणार आहोत. त्यामुळे आंदोलन करू नका असे सांगण्यात आले होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी सांगितली. परंतु कारखान्याने अर्धेच बिले काढून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आम्हाला शेतकऱ्यांची सत्तर टक्के बीले काढली आहेत असं सांगितले जात आहे. परंतू वास्तवात असं नाही. शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे २५ जुलै पर्यत बिले दिली नाहीत तर २७ जुलैला कारखानास्थळी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत व याची सर्वस्वी जबाबदारी लोकमंगल कारखाना आणि प्रशासनावर राहील असा ईशारा गुरुवारी (दि.१५) दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, जिल्हा कोषाध्यक्ष जगदिश पाटील, ज्येष्ठ नेते नागन्ना वकील, शहराध्यक्ष आयुब शेख, दादा पाटील, नवाज सय्यद, प्रकाश भगत, स्वप्नील माटे, रवी राठोड, सचिन रणखांब, प्रशांत हाके आदी उपस्थित होते.