प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी विमा कंपनीस सूचना द्याव्यात व अडचणीतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील साळुंके यांनी खा. शरद पवार व खा. सुप्रियाताई सुळे यांच्याकडे गुरुवारी (दि.७) मुंबई येथे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यातील एकूण ५९,२४८ शेतकऱ्यांनी यावर्षीचा प्रधानमंत्री खरीप पीक विमा उतरविला होता. यामध्ये प्रामुख्याने उडीद, तूर, मूग, सोयाबीन आदी पिकांचा समावेश होता. ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातील बहुतांश भागात सलग दोन दिवस अतिमूसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिकांबरोबर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून सरसकट मदत दिली. परंतु शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला असतानाही विमा कंपनीच्या जाचक अटींमुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळू शकली नाही. विमा कंपनीने ७२ तासाची जाचक अट घातल्याने शेतकरी विम्याच्या रकमेपासून वंचित राहिला आहे. तालुक्यातील फक्त ५,५२४ शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १० हजार प्रमाणे विमाकंपनीने तुटपुंजी मदत दिली आहे. कृषी विभागाकडून तालुक्यातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला आहे. त्याची माहिती विमा कंपनीला असतानाही विमा कंपनीकडून जाणीवपूर्वक अटी व नियमांवर बोट ठेवून शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आपण विमा कंपनीला योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांनाही हे निवेदन देण्यात आले.