वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त गुरुवारी ( दि. ८) दुपारी भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत अक्षय शेळके (टाका) व राम शेळके (सोलापूर) यांच्यात अंतिम कुस्ती झाली. जवळपास २० मिनिटे चाललेली ही कुस्ती निकाली निघत नसल्याने कुस्ती बरोबरीत काढण्यात आली. त्यामुळे बक्षिसाची रक्कम विभागून देण्यात आली. कुस्त्या पाहण्यासाठी माकणीसह पंचक्रोशितील हजारो कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा बुधवारी ( दि. ७) सुरु झाली. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या कुस्तीच्या स्पर्धा गुरुवारी (दि. ८) पार पडल्या.
या स्पर्धेत जवळपास ४०० मल्ल सहभागी झाले होते. सिद्धेश्वर मंदिरासमोरील मैदानात या स्पर्धा पार पडल्या. यातील अनेक मल्लांच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. अक्षय शेळके (टाका) व राम शेळके (सोलापूर) यांच्यात अंतिम कुस्ती झाली. ही कुस्ती जवळपास २० मिनिटे चालली. कुस्ती निकाली निघत नसल्याने ही कुस्ती बरोबरीत काढण्यात आली.
कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून ज्ञानेश्वर सूर्यवंशी, महादेव बंडगर, शहाजी आळंगे, अंकुश कोरडे, फुलचंद आळंगे, श्रीकांत जाधव, राम लोभे, अंतोबा सूर्यवंशी यांनी काम पाहिले. अंतिम कुस्ती १५ हजारांची होती. ही कुस्ती बरोबरीत निघाल्याने दोन्ही मल्लांना ही रक्कम विभागून देण्यात आली.