वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
श्री शिवमल्हार चॅरिटेबल ट्रस्ट भुसणी व मातोश्री कै. विजयाबाई बब्रुवान भुजबळ बहुद्देशीय संस्था लोहारा तालुक्यातील वडगाववाडी येथे उस्मानाबाद जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सलग दोन दिवस कुस्त्यांचा फड रंगणार आहे. अंतिम कुस्ती महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर आणि हरियाणा येथील महान भारत केसरी विजेता प्रविण कुमार यांच्यात होणार आहे. विजेत्या मल्लास एक लाख एकावन्न हजार रुपयांचे पारितोषक देण्यात येणार आहे.
लोहारा तालुक्यातील वडगाववाडी येथील कै. विजया भुजबळ यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग दोन दिवस या स्पर्धा चालणार आहेत. ३५ ते १३० किलो वजन गटातील मल्लांच्या कुस्त्या मॅटवर खेळविल्या जाणार आहेत. दि. ३० ऑक्टोबरपासून या स्पर्धेस सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री बसवराज पाटील, सिध्दराम म्हेत्रे, गहिनीनाथ महाराज औसेकर, जेवळी मठाचे गंगाधर महास्वामी यांच्या उपस्थितीत होणार आहे.दि. ३१ ऑक्टोबरला स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राचे उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अर्जून पुरस्कार विजेते काका पवार, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते पोलिस उपअधीक्षक राहुल आवारे, मुंबई महापौर केसरी जीवन बिराजदार, कोल्हापूर महापौर केसरी ज्ञानेश्वर गोचडे, महान महाराष्ट्र केसरी दिलीपनाना भरणे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड व राहुल काळभोर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या मल्लास रोख रक्कमेसह तीन किलो तूप, तीन किलो बदाम, चषक, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी दि. ३१ ऑक्टोबर ला हरियाणा येथील महान भारत केसरी विजेता प्रविण कुमार व महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर यांच्यात एक लाख एकावन्न हजाराच्या पारितोषकासाठी कडवी झुंज होणार आहे. परगावाहून आलेल्या मल्लांची राहाण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. या स्पर्धेत मल्लांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पैलवान धनराज भुजबळ, पैलवान रामेश्वर कार्ले यांनी केले आहे.