वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील वाडीवडगाव येथे जिल्हा अजिंक्य पद कुस्ती चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन माजी मंत्री तथा काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, पंढरपुर संस्थानचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मनिप्र गंगाधर महास्वामी ( जेवळी ) यांच्या हस्ते शनिवारी (दि.३०) करण्यात आले.
लोहारा तालुक्यातील वडगाववाडी येथे उस्मानाबाद जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सलग दोन दिवस कुस्त्यांचा फड रंगत आहे. अंतिम कुस्ती महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर आणि हरियाणा येथील महान भारत केसरी विजेता प्रविण कुमार यांच्यात होणार आहे. विजेत्या मल्लास एक लाख एकावन्न हजार रुपयांचे पारितोषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्हातील एकूण ४०० मल्लांनी सहभाग घेतला आहे . शनिवारी (दि. ३०) या स्पर्धेचे उदघाटन माजी मंत्री तथा काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, पंढरपुर संस्थानचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मनिप्र गंगाधर महास्वामी ( जेवळी ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकचे माजी चेअरमन बापुराव पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, गटविकास अधिकारी सोपान अकेले, माजी जि.प. सदस्य दिपक जवळगे, विठ्ठल साई साखर कारखाना संचालक शामसुंदर तोरकडे, बसवराज कारभारी, शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे , सरपंच रामचंद्र आलुरे (अणदुर), माजी जि.प. सदस्य गुंडाप्पा भुजबळ गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ, मुख्याधिकारी सचिन भुजबळ, तालुका आरोग्य अधिकारी अशोक कटारे, सरपंच वनमाला भुजबळ, उद्धव रणखांब आदी उपस्थित होते. लोहारा तालुक्यातील वडगाववाडी येथील कै. विजया भुजबळ यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग दोन दिवस या स्पर्धा चालणार आहेत. ३५ ते १३० किलो वजन गटातील मल्लांच्या कुस्त्या मॅटवर खेळविल्या जात आहेत. दि. ३० ऑक्टोबरपासून या स्पर्धेस सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन गहिनीनाथ महाराज औसेकर, जेवळी मठाचे गंगाधर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुररकारांने सन्मान करण्यात आला.
दि. ३१ ऑक्टोबरला स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राचे उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अर्जून पुरस्कार विजेते काका पवार, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते पोलिस उपअधीक्षक राहुल आवारे, मुंबई महापौर केसरी जीवन बिराजदार, कोल्हापूर महापौर केसरी ज्ञानेश्वर गोचडे, महान महाराष्ट्र केसरी दिलीपनाना भरणे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड व राहुल काळभोर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या मल्लास रोख रक्कमेसह तीन किलो तूप, तीन किलो बदाम, चषक, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी दि. ३१ ऑक्टोबर ला हरियाणा येथील महान भारत केसरी विजेता प्रविण कुमार व महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर यांच्यात एक लाख एकावन्न हजाराच्या पारितोषकासाठी कडवी झुंज होणार आहे. परगावाहून आलेल्या मल्लांची राहाण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. पंच म्हणून राजाभाऊ देवकते, वामनराव गाते, श्रीराम गोडगे, सोमनाथ फुलसुंदर, तात्यासाहेब भैर, बालाजी भुरंगे, खोबरे ( गुरुजी ) हे काम पाहत आहेत. स्पर्धा यशस्वीतेसाठी रुस्तुम इ हिंद अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष पैलवान धनराज भुजबळ, सदगुरु कुस्ती संकुल अध्यक्ष पैलवान रामेश्वर कार्ले, दयानंद भुजबळ, भागवत बनकर, आप्पास भुजबळ, अरुण गिराम, पै. व्यंकट भुजबळ, प्रभाकर बोडके आदी परिश्रम घेत आहेत. यावेळी जिल्हातील हजारो कुस्ती प्रेमी व नागरिक उपस्थित होते.