वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे ईतर तालुक्याला जी मदत देण्यात आली आहे त्याप्रमाणे लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.१६) तहसीलदार संतोष रुईकर यांना हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारकडून अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या यादीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ९० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्या अनुदान यादीतून लोहारा तालुका वगळण्यात आला आहे. लोहारा तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा जास्त १५० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे येथील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. तसेच शंखी गोगलगायीमुळेही अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याही अनुदानातून लोहारा तालुका वगळण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. उमरगा व लोहारा तालुक्याचे आमदार एकच असताना मदत मात्र उमरगा तालुक्याला मिळते. व लोहारा तालुका त्यातून वगळला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.
तरी मंत्री महोदयांना विनंती आहे की, ज्या प्रमाणे इतर तालुक्याला मदत झाली आहे. त्याच प्रमाणे लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळाली पाहिजे. जर सदरील मदत येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांना मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना पाटील, नगरसेवक जालिंदर कोकणे, राजेंद्र कदम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, प्रकाश भगत, सुशांत शिंदे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.