वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील १० स्वयंसहायता गटांना दहा लाख रुपये कर्ज वाटप व १४ गटांना २० लाख रुपये कर्ज मंजुरी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहायता समूहांना बँक कर्ज वितरण मेळावा गुरुवारी (दि.२३) सास्तुर येथे घेण्यात आला. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सहजिल्हा अभियान संचालक तथा प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गटांना कर्ज वाटप करण्यात आले. सदर कर्जामधून महिलांनी स्वतःची उपजीविका तयार करून कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रांजल शिंदे यांनी यावेळी उपस्थित महिलांना केले. तसेच घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर करून अभियानामार्फत देण्यात येणाऱ्या सुमतीबाई सुकळीकर परियोजनेमध्ये देण्यात येणाऱ्या व्याज परताव्याचा लाभ गटांनी घ्यावा असे प्रतिपादन त्यांनी केले. या मेळाव्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रदीप डाके, जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे, तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे, तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकधोंड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी तर प्रीतम बनसोडे यांनी आभार मानले. या मेळाव्याकरिता योगिता थोरात, बँक सखी मालन कांबळे यांच्यासह प्रभागातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी परिश्रम घेतले.