वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे गुरुवारी (दि. २४) जाणीव जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला स्पर्श ग्रामीण रुग्णालय याठिकाणी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून आलेले क्षयरोग नियंत्रण सुपरवायझर नागेश ढगे, स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा कदम, डॉ. वैभव माडजे, कार्यक्रम अधिकारी अच्युत आधटराव, तुकाराम गायकवाड यांच्यासह सर्व कर्मचारी, रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक व सास्तूर गावातील ग्रामस्थांनी क्षयरोग विषयक शपथ घेतली. त्यानंतर स्पर्श ग्रामीण रूग्णालयामधून संपुर्ण गावामध्ये जनजागरण रॅली काढण्यात आली.जागतिक क्षयरोग दिनानिमित्त “ टी बी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा” या घोषवाक्याप्रमाणे क्षयरोग संपविण्यासाठी व संपूर्ण भारत टीबी मुक्त करण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजेत. आज भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्षयरोगाचे रुग्ण सापडत आहेत. क्षयरोगमुळे बरेच लोक मृत्यूच्या दारात जात आहेत. त्यामुळे क्षयरोग संपविण्यासाठी प्रत्येकाने आपली योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने स्वतचा व कुटुंबाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करावे. रॅली सुरु होण्यापूर्वी स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी सर्व कर्मचारी, रुग्ण नातेवाईक व ग्रामस्थांना क्षयरोगाविषयी माहिती दिली. यामध्ये क्षयरोग म्हणजे काय, क्षयरोगाची कारणे, क्षयरोगाची लक्षणे व क्षयरोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी इत्यादी विषयी सर्वाना माहिती दिली. तसेच क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. फक्त प्रत्येक व्यक्तीने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर क्षयरोगविषयक सर्वांनी शपथ घेतली. त्यामध्ये क्षयरोगाविषयी घेण्यात येणारी काळजी, प्रतिबंधक उपाय, औषधी उपचार इत्यादी विषयी माहिती दिली. शपथ झाल्यानंतर स्पर्श ग्रामीण रुग्णालयातून रॅली काढण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, क्षयरोग विभाग जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथील नागेश ढगे, तालुका क्षयरोग अधिकारी ज्ञानेश्वर बिराजदार, ग्रामीण रुग्णालय स्पर्शचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा कदम, कार्यक्रम अधिकारी अच्युत आदटराव, तुकाराम गायकवाड यांच्या हस्ते जनजागरण रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. ही रॅली संपूर्ण सास्तूर गावामधून काढण्यात आली.